मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुढील नियोजित कार्यक्रम आणि राजकीय दौरे तात्पुरते पुढे ढकलण्यात आले आहेत.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये कामाचा अतिताण आणि प्रचंड दगदग याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला आहे. तसेच त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. यानंतर काही कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे ठाण्यात गेले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर
एकनाथ शिंदे रुग्णालयातच असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही विशेष काळजी करण्याचे कारण नाही. एकनाथ शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे सतत व्यग्र होते. यानंतर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. कामाचा ताण, व्हायरल ताप आणि अशक्तपणा याचाच परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. घरी उपचार करण्यापेक्षा रुग्णालयात दाखल होऊन औषधोपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यामुळे शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात दुपारच्या सुमारास धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला. अखेर रात्री २ वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा ठाण्यात पक्षप्रवेश झाला .